माळमाथ्यावरील शेतकऱ्यांनी २० जूननंतरच पेरणी केल्यामुळे यावर्षी खरीप पिकांना थोडा उशीर झाला आहे. पावसाला उशीर झाल्याने कापसाची रोपे अद्यापही जमीन सोडलेली नसल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्याचप्रमाणे मका पिकालाही ग्रहण लागण्याची शक्यता आहे. लष्करी आळीने बागलाण तालुक्यात धुमाकूळ घातल्याने अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर कृषी विभागाने लवकरात लवकर काळजी घेऊन फवारणी किंवा आदी व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अन्यथा मक्याचे पीक लष्करी अळीचा प्रादुर्भावास बळी पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माळमाथ्यावर कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये प्रति पायली या दराने बियाणे उपलब्ध करून त्याची पेरणी केली आहे. मात्र पावसाची किंवा वातावरणाची साथ नसल्याने ही रोपे पन्नास टक्क्याच्या प्रमाणातच उगवणक्षमता झालेली असल्याने शेतकर्यांना पुन्हा बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. उन्हाळ कांद्याला बाजारभाव असला तरी सद्य:स्थितीत हे दर सरासरी १३ हजार रुपयांप्रमाणे झाल्याने शेतकर्यांनी कांदा लागवडीसाठी हात आखडता घेण्याचे चित्र दिसत आहे. पावसाची स्थिती बरी असली तरी विहिरी, नद्या, तळी अद्याप रिकामी आहेत. नदीनाल्यांनाही पाऊस पाणी न गेल्याने जमीन भिजलेली नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. यामुळे शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघताना दिसत आहेत. साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीपण अद्याप मोठा पाऊस झालेला नसल्याने जमिनीची उष्णताही बाहेर निघालेली नाही. त्यामुळे जमिनीची धूप वाढून त्याचा परिणाम लहान पिकावर होत वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे पाण्याची पिकांना गरज आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या पावसासाठी निसर्गावर भरवसा ठेवला आहे. माळमाथ्यावर भुईमूग, कडधान्य आदी पिके उत्पादन घेण्यासाठी घटलेली आहेत. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
माळमाथा परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST