नाशिक : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळविला. अभियांत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे १३ लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. वृंदा हिने ३२१ गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले.वृंदा नाशिकरोड येथील सेंट झेविअर्स हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिने दहावीत ९४ टक्केइतके गुण मिळविले होते. पंचवटी महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा दिली. ‘आयआयटीएन्स स्पेस’ या अकॅडमीतून तिने जेईईचा अभ्यास केला आहे. आयआयटीमधून संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची वृंदाची इच्छा आहे. तिचे वडील नंदकुमार राठी हे प्रॉडक्शन इंजिनिअर असून, एनआयटी सुरतमधून त्यांनी पदवी घेतली आहे. त्यांचा सिन्नर औद्योगिक वसाहतीत लघुउद्योग आहे. तर वृंदाची आई कृष्णा राठी आर्किटेक्ट आहेत. त्यांनीही एनआयटी नागपूर येथून आर्किटेक्टची पदवी घेतली असून, एनआयटी अहमदाबाद येथून पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.देशातील अव्वल दर्जाच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग संस्थेच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा अनुक्रमे २, ४ आणि ९ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
जेईई मेन्स परीक्षेत नाशिकची वृंदा राठी मुलींमध्ये देशात प्रथम
By admin | Updated: April 28, 2017 02:36 IST