नाशिक : भाजपाच्या महिला मेळाव्यात गोंधळ घातल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.११) जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. निकाल अर्जावर मंगळवारी (दि.१२) निर्णय होणार आहे. मंगळवारी सकाळी प्रभाग समितीची निवडणूक असल्यामुळे मतदान करता यावे, यासाठी बडगुजरांमार्फत वकिलाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी न झाल्याने बडगुजर मतदानाला मुकणार आहे.स्वतंत्र मराठवाड्याच्या मुद्यावरून शिवसेनेने मार्च महिन्यात भाजपाच्या महिला कार्यक्र मात धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दरोड्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी दहा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी बडगुजर यांच्यासह पवन मटाले यांनाही अटक केली. बडगुजर व मटाले यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने ६ एप्रिलपासून ते मध्यवर्ती कारागृहात आहे. दोघांच्या जामीन अर्जासाठी सुरुवातीस प्रथम वर्ग न्यायाधीश डी. डी. कोळपकर यांच्या न्यायालयात अर्ज करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर बडगुजर यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी महापालिकेच्या प्रभाग सभापती समितीची निवडणूक होत आहे. यासाठी सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे अॅड. राहुल कासलीवाल यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश कोळपकर यांच्याकडे मतदानासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र न्यायालयात या अर्जावर सुनावणी न झाल्याने त्याचा निकालही उद्याच लागण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रि या पार पडेल. त्यामुळे बडगुजर यांना प्रभाग सभापती समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही, हे निश्चित झाले आहे.
मतदानाला बडगुजर मुकणार
By admin | Updated: April 12, 2016 00:13 IST