मनमाडलोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा असली तरी पोटासाठी सततची भटकंती करावी लागत असल्याने मतदानापासून वंचिंत रहावे लागत असल्याची खंत खान्देशातील प्रसिद्ध तमाशा कलावंत प्यारेलाल वाघ (नगरदेवळेकर) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. भालूर येथे यात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.तोंडावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी देवळा येथे यात्रोत्सवानिमित्त त्यांच्या ‘रतनभाऊ व सोमनाथभाऊ नगरदेवळेकर’ या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुतांश तमाशा कलावंत हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा हक्क भटकंतीमुळे बजावता येणार नाही.पोटासाठी भटकणाऱ्या तमाशा कलावंताना ज्या गावात कार्यक्रम असेल तेथेच मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कुठलेही सरकार सत्तेवर आले, तरी तमाशा कलावंतांची उपेक्षा थांबलेली नाही, जे खरे कलावंत आहे तेच शासकीय मानधनापासून वंचित असल्याचे वाघ यांनी निदर्शनास आणून दिले. तमाशाला जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही, तोपर्यंत कलावंतांना हलाकीचे जीवन जगावे लागणार आहे. कलावंतासाठी शासकीय कोट्यातून देण्यात येणारे पेट्रोलपंप तसेच घरकूलयासारख्या लाभांचा फायदा तळागाळापर्यंत काम करणाऱ्या खऱ्या तमाशा कलावंतास मिळत नसल्याची खंत वाघ यांनी व्यक्त केली. आज अनेक छोटे-मोठे तमाशा फडमालक खासगी सावकारांच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. प्रेक्षक वर्ग कमी झाल्याने फड चालवणे मुश्कील झाले आहे. सावकाराचे व्याज वाढत गेल्याने कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. अशा तमाशा फडाच्या कर्जाचा शासनाकडून विचार करण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सर्वत्र ग्रामंपचायत निवडणुकींचे वातावरण तापले आहे. गावातील अंतर्गत राजकीय गटबाजीमुळे कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रकार काही गावांमधून घडून येतात. राजकीय लोकांना तमाशा कलावंताचे दु:ख जाणून घ्यावचे नसेल तरी त्यांनी त्रास तरी देऊ नये, अशी अपेक्षा प्यारेलाल वाघ यांनी व्यक्त केली.
पोटासाठीची भटकंती हिरावते मतदानाचा ‘हक्क’!
By admin | Updated: April 20, 2015 01:21 IST