नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांतून नाव वगळल्यासंबंधी निवडणूक अधिकार्याकडे तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ व ६१ मधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने संबंधित प्रभागातील मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी चालून आली असून, २७ मे पर्यंत मतदारांना आपले नाव महापालिकेच्या मतदार यादीत नोंदता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ व ६१ मधील पोटनिवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार येत्या २० मे रोजी विधानसभेच्या मतदार यादीवरून प्रारुप मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २७ मे पर्यंत संबंधित मतदार यादीबाबत कुणाच्या हरकती व सूचना असल्यास त्या मागविल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने प्राप्त हरकती व सूचनांच्या आधारे विधानसभा मतदार याद्यांवरून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करताना त्यातील चुकीची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. दुसर्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावे वगळून संबंधित प्रभागात समाविष्ट करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा यादीत मतदारांची नावे असूनही महापालिकेच्या मतदार यादीमध्ये त्यांची नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मतदारांची नावनोंदणी केली जात नाही. विधानसभा मतदार याद्यांवरूनच पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार केल्या जातात. मात्र या याद्या तयार करताना लेखनिकांच्या काही चुका असल्यास त्या सुधारणे, दुसर्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असतील तर त्यांची नावे त्या प्रभागातून वगळणे व ती संबंधित प्रभागात समाविष्ट करणे, याबाबतही आयोगाने यंत्रणेला सूचित केले आहे. महापालिकेची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी कधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यावर हरकती व सूचना कधीपर्यंत कोणाकडे सादर करावयाच्या आहेत, यासंबंधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत. प्रभाग १७ व ६१ मधील मतदारांना संधीनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याची ओरड झाली होती. आता प्रभाग १७ व ६१ मधील मतदारांना आपले नाव प्रारुप मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करता येणार आहे आणि संबंधित प्रभागातील मतदारांना नाव वगळले असल्यास नव्याने नाव समाविष्ट करण्याची संधी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. निवडणूक आयोगाकडून अधिप्रमाणित केलेली मतदार यादी व त्याबाबतची सूचना ३१ मे रोजी आयोगाच्या संकेतस्थळावरही झळकणार आहे.
वगळलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीनिमित्त संधी पालिका पोटनिवडणूक : दोन प्रभागात मतदार याद्या होणार अधिप्रमाणित
By admin | Updated: May 11, 2014 20:02 IST