सिन्नर : करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिरात शनिवारी भेट दिली. अचानक भेट दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला. येथील भैरवनाथ मंदिराचे परमभक्त ह. भ. प. त्र्यंबकबाबा भगत यांनी शंकराचार्य यांचे श्रीफळ, शाल देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत त्र्यंबकबाबा भगत यांनी सुमारे चारशे वर्षांच्या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची माहिती सांगितली. विविध धार्मिक विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. शंकराचार्यांनी बाबांच्या धार्मिक कार्याचा गौरव केला. श्रीमद् शंकराचार्य यांनी केवळ सिन्नरकरांनाच नव्हे, तर अखंड मानव जातीला सुख, समृद्धी, शांतता व निरामय आरोग्य लाभण्यासाठी ‘सर्वे संतू निरामय:’ अशा शब्दांत आशीर्वाद दिले. शंकराचार्य मंदिरात आल्याचे माहिती सिन्नर शहरात पसरल्यावर त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संंखेने गर्दी केली होती. भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे सुधाकर भगत, मधुकर भगत, बाळासाहेब शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष मु. शं. गोळेसर आदींसह ज्येष्ठ नागरीक, भाविक मोठ्या संख्येने प्रसंगी उपस्थित होते. (वार्ताहर)
भैरवनाथ महाराज मंदिरात भेट
By admin | Updated: June 2, 2014 01:56 IST