विंचुरे : बागलाण तालुक्यातील विंचुरे व परिसरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. येथील नागरिक थंडीताप, सर्दी, खोकला, घसादुखी, हाता-पायांना सुज येणे, सांधे दुखणे यांसह विविध आजारांनी हैराण झाले आहेत. साथीच्या आजारांनी थैमान घातले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले आहे. गावात चिकुन गुन्यासदृश्य रुग्ण आढळून आले असून, ते कंधाणे येथील खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे. त्यांचे रक्ताचे नमुने तपासल्याशिवाय नेमका आजार सांगणे अशक्य आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी गावातील एकाच घरातील पाच सदस्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यांनी सटाणा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतला. आज गावात अशा प्रकारचे तीन-चार महिला रुग्ण आढळून आले असून, त्यांचे हात पाय, सांधे दुखणे, पांढऱ्या पेशी कमी जास्त-होणे असे आणि मलेरिया टायफाईडसदृश्य आजाराचे बरेच रुग्ण असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.गावात गाजरगवत आणि बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. यांसारखे आजार पसरविणाऱ्या किटकांना लपण्याचा वाव मिळतो तसेच गावात सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पाणी साचलेल्या डबक्यात डासांची उत्पती होते म्हणूनच गावात साथीच्या रोगांची लागण होत आहे. (वार्ताहर)
विंचुरे : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
By admin | Updated: October 11, 2015 22:18 IST