द्याने : परिसरात अवैध गावठी दारू, विदेशी दारू विक्रीचे पेव फुटले असून, उत्राणे, आसखेडा, वाघळे, खामलोण, राजपूरपांडे, अंबासन या गावांत व शिवारात गावठी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्र ी होत असून, रस्त्यावरील झाडाझुडपांच्या आडोशाला, मोकळे पटांगण, शाळेच्या इमारतीच्या गच्चीवर सायंकाळी मैफली जमत असून, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. मद्यपी आरडाओरडा करत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनात गुरफटत चालली आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.मोसम नदी परिसरात अवैधरीत्या गावठी दारूच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गावठी दारू पिण्यासाठी मद्यपींचा मेळाच भरत असल्याचे चित्र द्याने व परिसरात दिसून येत आहे. नदीकाठच्या वातावरणाचा वापर मद्यपींकडून सर्रासपणे केला जात आहे. तसेच रस्त्यावर शांत निर्जन जागेवरील झाडाझुडपांचा वापर केला जात असल्याची बाब थक्क करणारी आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गावठी दारू मिळते. ही दारू पिण्यासाठी अनेक मद्यपी गटागटाने येथे बसलेले असतात. पाणीटंचाई असल्याने अगदी सहजपणे एकवेळ दारूचा घोट मिळेल पण पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशाप्रकारे अवैध गावठी दारू खरेदी-विक्रीचा धंदा राजरोस सुरू आहे. पोलीस प्रशासनाला माहिती असूनही त्यांची डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी विषारी दारूमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी अवैध गावठी दारू खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.जायखेडा व नामपूर दूरक्षेत्रांतर्गत एकूण ९० गावे असून, फक्त अवघे ४० पोलीस कारभार बघतात. अपुऱ्या पोलीस संख्याबळामुळे कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. (वार्ताहर)
गावठी, विदेशी दारूची विक्र ी जोरात
By admin | Updated: July 30, 2016 00:04 IST