नायगाव : होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड न करता गवऱ्या व टाकाऊ वस्तूंची होळी करण्याचा संकल्प करत गावात एकच होळी पेटविण्याचा आदर्श ठराव चिंचोली येथे ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील मोहन सांगळे यांनी दिली.दिवसेंदिवस विविध कारणांसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरली आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी जागतिक स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी चिंचोलीकरांनी गावात एकच होळी पेटविण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी होळीत लाकडांचा वापर पूर्णपणे थांबवून गोवऱ्या, कपडे, खोके आदि टाकाऊ वस्तू टाकण्याचे आवाहन ग्रामसभेत करण्यात आले आहे. जंगल संवर्धन होण्यासाठी वृक्षतोड थांबविण्याचा संकल्प करत होळी सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी पोलीसपाटील सांगळे यांच्यासह तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, शालेय समिती अध्यक्ष दत्तू नवाळे, सूर्यभान नवाळे, सोमनाथ दराडे, एकनाथ झाडे, राजू उगले, अनिल उगले, ज्ञानेश्वर सानप, पवन नवाळे, सुदेश तुपे, आर. पी. झाडे आदिंसह ग्रामस्थ बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
चिंचोलीत साजरी होणार एक गाव एक होळी
By admin | Updated: March 22, 2016 23:10 IST