लोकमत न्यूज नेटवर्कसाकोरा : गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त साकोरेकरांना पावसाने शनिवारी थोडाफार दिलासा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात साठवून ठेवलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. वादळाचा जोर असल्याने सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. साकोरेकरांना रात्र अंधारात काढावी लागली.नांदगाव तालुक्यातील साकोरा सर्वात मोठे गाव म्हणून गणले जाते. या गावात गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे संबंधित अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. स्थानिक वायरमनच नसल्याने ‘वायरमन दाखवा बक्षीस मिळवा’ असे म्हणायची वेळ आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किरकोळ बिघाडामुळे साकोरेकरांना रात्र-रात्र अंधारात बसून उकाड्याचा सामना करावा लागतो. त्यात लहान मुलांची तर अवस्था केविलवाणी होताना दिसते. शनिवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतात उघड्यावर असणारी पिके विशेषत: कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. या वादळाचा जोर असल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सर्व शांत झाल्यानंतर पुन्हा ग्रामस्थांना उकाड्याचा सामना करावा लागला. पावसाळ्यात होणारा खंडित वीजपुरवठा ही समस्या साकोरेकरांना नित्याचीच झाली आहे. वीजबिल नित्यनियमाने भरूनही साकोरेकरांना रात्रभर अंधारात बसावे लागणे म्हणजे दुर्दैवच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे स्थानिक नेते या बाबतीत गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक वायरमन असता तर त्याने रात्री केव्हातरी सुरळीत केला असता असे बोलले जात आहे. महावितरण कंपनीने त्वरित दखल घेऊन गावासाठी स्वतंत्र मुक्कामी वायरमन द्यावा व साकोरेकरांची कायमची अडचण दूर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. रात्रभर वीजपुरवठा खंडित होणे हे नित्याचे झाले आहे.
वायरमन नसल्याने गाव अंधारात
By admin | Updated: May 15, 2017 00:43 IST