नाशिक : जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, मात्र चांगले काम करणाऱ्या सदस्यांना पुरस्कार दिले जावेत, अशी सूचना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी मांडली. त्यास सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने दरवर्षी पाच महिला व पाच पुरुष सदस्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येणार आहे.सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी ही संकल्पना मांडली. दरवर्षी पाच महिला व पाच पुरुष सदस्यांना त्यांच्या वर्षभरातील उत्कृष्ट कामकाजामुळे सन्मानित करण्यात यावे, असे आपल्याला वाटते. तसेच जिल्'ात एक गाव आदर्श करण्यासाठी आपण आपला सेसचा निधी वापरू, असे त्यांनी सांगितले. शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुरस्कार देणे चांगली संकल्पना असली तरी त्यासाठी निवड समितीत पदाधिकाऱ्यांना घेऊ नका, नाही तर वशीलेबाजी होईल, असे सांगताच सभागृहात हशा पिकला. प्रा. अनिल पाटील यांनीही मग संधी साधत या निमित्ताने का होईना, सदस्यांना वर्षभर का होईना चांगले काम करावे लागेल, असे सांगताच पुन्हा सभागृहात खसखस पिकली. (प्रतिनिधी)
पुण्याच्या धर्तीवर नाशिकलाही विकास पुरुष, महिला पुरस्कार
By admin | Updated: March 29, 2015 00:19 IST