नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या ढिम्म कारभाराचा फटका विरोधी पक्षनेते कार्यालयाला बसला असून, दोन दिवसांपूर्वीच सूचना देऊनही कक्षाच्या गळतीची दुरुस्ती न केल्याने जिल्हा परिषदेचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी बांधकाम व अर्थ सभापती तथा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी या विरोधी गटनेता कार्यालयाची दुरुस्ती करण्याची तंबी संबंधित मक्तेदारास दिली होती; मात्र मक्तेदाराने उपाध्यक्षांचे आदेश ‘धाब्यावर’ बसविल्याचे व या कक्ष नूतनीकरणापोटी केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चावर कालच्या पावसाने ‘पाणी’ फेरल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीनजीकच असलेल्या पूर्वीच्या उपाहारगृहास विरोधी पक्षनेत्यांसाठी चकचकीत कार्यालय बनविण्यात आले आहे; मात्र या कार्यालयाजवळच असलेल्या उंबराच्या झाडाची फांदी तुटून या कार्यालयाचे सीमेंट पत्र्यांचे असलेले छप्पर फुटले होते. मनसेचे गटनेते संदीप पाटील यांनी मंगळवारी या विरोधी गटनेत्यांच्या कार्यालयास भेट दिली असता तेथे अस्वच्छता आढळली होती. तसेच या कार्यालयाच्या छपराचा पत्रा फुटल्याने कार्यालयास पावसामुळे गळती लागल्याचे चित्र होते. त्यामुळे बुधवारी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी तातडीने विरोधी गटनेत्यांच्या कार्यालयाचे काम पाहणारे मक्तेदार कांडेकर यांना बोलावून तत्काळ विरोधी गटनेत्यांचे कार्यालय स्वच्छ ठेवण्याबरोबरच फुटलेले पत्रे तत्काळ बदलण्याचे आदेश दिले होेते. आदेश देऊन दोन दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी (दि. १४) शहर व परिसरात जोरदार बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे विरोधी गटनेत्यांच्या चकचकीत कार्यालयात गळती होऊन हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते. आता प्रशासन व उपाध्यक्ष या प्रकरणी मक्तेदारावर कारवाईची काय भूमिका घेते याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
उपाध्यक्षांचे आदेश ‘धाब्यावरच’; कार्यालयाला लागली ‘गळती’ दोन दिवसांपूर्वीच दिल्या होत्या सूचना
By admin | Updated: November 15, 2014 00:29 IST