वावी : अंगाला झोंबणारा गार वारा, गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंभे, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधूर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघर पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आखाडी (दशावतारी) उत्सावाची थाटात सांगता झाली.गेली अनेक वर्ष बंद असलेल्या आखाडी (दशावतार) उत्सवाची परंपरा वावीकरांनी गेल्या काही वर्षांपूर्वी पुनर्जिवीत केली आहे. पर्जन्याच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी आखाडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता; मात्र काळाच्या ओघात ग्रामीण भागातून हे उत्सव बंद पडू लागले. मात्र वावीकरांनी त्याचे पुनर्जीवन करून मुबलक पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी पाच दिवस आखाडी साजरी करतांना पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले. पहिल्या दिवशी गणपती व शारदा अशी दोनच सोंगे नाचविली गेली यानंतर दुसऱ्या ते पाचव्या दिवसांपर्यंत गणपती, शारदा, वीरभद्र, खंडेराव, कच्छ, मच्छ, इंद्रजीत, एकादशी, रावण, वेताळ, नरसिंह, शंकर, रक्तादेवी, लव - कुश, श्रावणबाळ, भीम, वराह, मारुती, राम - सीता, दानव, ब्रम्हदेव, विदूषक व शेवटी गावदेवी अशी सोंगे नाचविण्यात आली. सोंगे नाचविण्यासाठी दिलीप काळोखे, पोपट वेलजाळी, राजेंद्र कांदळकर, दीपक वेलजाळी, संदीप ताजणे, सुनील गोराणे, भास्कर जाधव, ज्ञानेश्वर काळोखे, सुनील नवले, श्याम गायकवाड, शिवाजी भोसले, प्रमोद वाजे, पप्पू काटे, भाऊराव साळुंके, गणेश काटे, नितीन आनप, अक्षय खर्डे यांच्यासह कलावंतांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे दिवसेंदिवस सोगांच्या संस्थेत वाढत होत जात शेवटी ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी अवस्था झाली. आखाडी उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला, आबालवृद्ध व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.शेवटच्या रात्री सर्व सोंगे पुन्हा काढण्यात आली. पहाटे गाव देवीचे सोंग काढण्यात आले. देवीची दिवसभर गावातून मिरवणूक काढून प्रत्येक घरापुढे मोठ्या भक्तिभावाने पूजा करण्यात आली. आखाडी उत्सव साजरा करण्यासाठी समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
वावी येथे दशावतारी उत्सवाची भक्तिभावात सांगता
By admin | Updated: September 5, 2015 21:55 IST