त्र्यंबकेश्वर : वारसाहक्काप्रमाणे आपण ज्योतिर्मठाचे शंकराचार्य असून, आपले म्हणणे पटवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणाऱ्या वासुदेवानंद स्वामी यांचा दावा कोर्टाने फेटाळला असून, शंकराचार्य पदाचे सिंहासन, छत्र, चावर न वापरण्याचे आदेशही दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या खोट्या व स्वयंघोषित शंकराचार्यांचा सुळसुळाट समाजासाठी घातक असल्याचे प्रतिपादन शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.केशवस्मृती निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, सनातन धर्माचे रक्षण व प्रसार करण्यासाठी गंगेचे आणि हिंदुधर्माचे रक्षण सातत्याने होत राहावे या हेतूने आद्यगुरू शंकराचार्यांनी चार पीठांची निर्मिती केली होती. आजही केवळ चारच शंकराचार्य हे खरे शंकराचार्य असून, बाकीचे शंकराचार्य खोटे व स्वयंघोषित आहेत, असेही त्यांनी सांगितले.स्वत:ला शंकराचार्य म्हणवणाऱ्या नरेंद्रानंद यांच्याविषयी ते म्हणाले की, शंकराचार्यांनी काशीमध्ये कुठलाही मठ बनविलेला नव्हता. त्यामुळे ते कोणत्या आधारावर स्वत:ला काशीपीठाचे शंकराचार्य म्हणवता, याचे उत्तर त्यांनी द्यावे. हे शंकराचार्य धर्माच्या नियमाचे उल्लंघन करून गंगा नदी ओलांडून त्र्यंबकराजाच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. चतुर्मास संपेपर्यंत गंगानदी ओलांडू नये, असा नियम असल्याने आपणही त्र्यंबकमध्ये आल्यापासून एकदाही त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलो नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
शंकराचार्य पदाचा दावा सांगणारे वासुदेवानंद खोटारडे
By admin | Updated: September 22, 2015 23:03 IST