नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत ‘युवक सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या युवक सप्ताहास सुरुवात झाली असून, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊ व शिवछत्रपतींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर काळाराम मंदिर येथील स्वामी विवेकानंद पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बंग के आनंद की जय, विवेकानंद की जय’, ‘स्वामीजी का क्या संदेश, सुंदर सुहाना भारत देश’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी महानगर मंत्री अथर्व कुळकर्णी, महानगर सहमंत्री गौरी पवार यांनी युवक सप्ताहाची माहिती दिली. यावर्षी युवक सप्ताहामध्ये अभाविप नाशिकतर्फे शंभर महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून स्वामी विवेकानंद व नेताजी सुभाषचंद्र्र बोस यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी वत्कृत्व स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, प्रश्नावली स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच काही महाविद्यालयात उद्योजकता, एनआरसी, सीएए यांविषयी जनजागृती, स्वाक्षरी मोहीम आदी विविध उपक्रम युवक सप्ताह प्रमुख वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविले जाणार असल्याची माहिती अभाविपतर्फे देण्यात आली आहे.
अभाविपतर्फे ‘युवक सप्ताह’निमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:34 IST