नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी शुक्रवारी (दि़ ६) जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष मोक्का न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात आतापर्यंतचे सर्वात मोठे असे ५ हजार ७८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़ दरम्यान, या घोटाळ्यातील मास्टरमाइंड जितूभाई ठक्करला अद्यापही पोलीस शोधू शकलेले नाहीत़ वाडीवऱ्हे रेशन घोटाळ्यात आतापर्यंत १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन, अश्विन जैन व प्रकाश शेवाळे यांचा समावेश आहे़ विशेष सरकारी वकील अॅड़ अजय मिसर यांनी न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र आजपर्यंत सर्वांत मोठे दोषारोपपत्र असून, यामध्ये १४ आरोपी, तर ६०२ साक्षीदार आहेत़ न्यायालयाने पूनम घोरपडे, अश्विन जैन, प्रकाश शेवाळे, प्रशांत कहांडळ, लखन पटेल यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिलेली नसून या घोटाळ्याचा तपास करण्यास पोलिसांना परवानगी दिली आहे़ तसेच या घोटाळ्याचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे़ (प्रतिनिधी)
वाडीवऱ्हे रेशन घोटाळा : राज्यातील मोक्कान्वये पहिलाच गुन्हा
By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST