नाशिक : महानगरासह जिल्हाभरातील खासगी हॉस्पिटल्समधील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीबाबत प्रशिक्षण देण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून खासगी हॉस्पिटल्सना लसीचा पुरवठा झाल्यानंतर तेथील लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होऊ शकणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि काेमॉर्बिड रुग्णांसाठी लसीकरण सेवा शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र, घोषणेनंतर ४ दिवसांनीदेखील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला प्रारंभ झालेला नाही. गुरुवारी लस उपलब्ध झाल्यानंतर किंवा शुक्रवारपासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास प्रारंभ होणार आहे. मात्र, त्यासाठी आधी मोबाइलमधील को-विन ॲपवरून नोंदणी करणे तसेच समवेत निर्धारित कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रावर जाऊन मग नोंदणी करण्यातून होणारी गर्दी किंवा रांगांमुळे लस न घेता परतावे लागण्याची शक्यता कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना नाव नोंदणीसाठी अडचणी येत असतील तर अशा व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊ शकतात. पात्र लाभार्थी त्यांच्या सोईनुसार केंद्राची निवड करू शकतात. तसेच उपलब्ध वेळेअंतर्गत लसीकरणासाठी वेळ निवडू शकतात. तसेच ४५ ते ५९ वर्षांच्या व्यक्ती गंभीर आजारांना तोंड देत असतील तर अशांनाही कोरोना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थींची नोंदणी करता येणार आहे. ‘ओटीपी व्हेरिफिकेशन’नंतर लाभार्थींचे को-विन अकाउंट उघडण्यात येणार असून, त्यावर नाव, जन्माचे वर्ष, लिंग आदी तपशील भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे.
इन्फो
कागदपत्रे बंधनकारक
ज्या नागरिकांना लसीकरण करायचे असेल अशा व्यक्तींनी त्यांच्या समवेत आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, वयाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींन नोंदणीकृत डॉक्टरांचे केंद्र सरकारकडून उपलब्ध नमुन्यातील प्रमाणपत्र, तसेच ऑनलाइन नोंदणी करताना व्याधीग्रस्त व्यक्तींना आजाराची माहिती देणे बंधनकारक आहे.