सुरगाणा : मोठ्या प्रतीक्षेनंतर बाऱ्हे येथील पोलीस ठाणे उद्या (दि. २०) रोजी सुरू होत असल्याने बाऱ्हे पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ६१ गावे व पाड्यांमधील पीडित नागरिकांना या नव्याने सुरू होत असलेल्या पोलीस ठाण्याची सुविधा मिळणार आहे.शंभर टक्के आदिवासी असलेल्या या तालुक्यासाठी केवळ सुरगाणा पोलीस ठाणे होते. दुर्गम भागातील पीडित नागरिकांना सुरगाणा पोलीस ठाण्यात संपर्क करणे किंवा थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच तालुक्याचा परिसर मोठा असल्याने एकमेव सुरगाणा पोलीस ठाण्यावरचा ताणदेखील वाढलेला होता. त्यामुळे बाऱ्हे येथील स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. माजी आमदार ए.टी.पवार यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथील अडचण लक्षात घेऊन बाऱ्हे पोलीस ठाण्याची मागणी पूर्ण केली. सद्यस्थितीत खासगी इमारतीत पोलीस ठाणे सुरू होणार असून, याआधी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते दोन वेळेला उद्घाटन होता होता राहिले.मात्र आता उद्यापासून बाऱ्हे पोलीस ठाणे कार्यरत होत असल्याने बाऱ्हे परिसरातील नागरिकांना त्यांचे तक्रार अर्ज, फिर्याद इत्यादि सुरगाणा पोलीस ठाण्याऐवजी बाऱ्हे पोलीस ठाण्यात करावे लागणार असल्याने अशा नागरिकांचा वेळ व पैसादेखील वाचणार आहे.नवनिर्मित बाऱ्हे पोलीस ठाण्याकरिता एक एपीआय व २४ पोलीस कर्मचारी नेमणुकीस असणार आहेत. उद्यापासून येथे रूजू होत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील तावडे हे बाऱ्हे पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळणार आहेत.नव्याने निर्माण झालेल्या बाऱ्हे पोलीस ठाण्यामुळे तालुक्यातील दोन पोलीस ठाणे झाले आहेत. बाऱ्हे पोलीस ठाणेअंतर्गत १३ ग्रामपंचायत येत असून, यामध्ये ६१ गावे व १३ पाड्यांचा समावेश आहे. ही सर्व गावे व पाडे पुढीलप्रमाणे- बाऱ्हे, गडगा, पोपाळपूर, आळीवदांड (शेंदरपाडा), गुरटेंबी, हट्टीपाडा, वाघनखी, म्हैसमाळ, ठाणगांव, बेडसे, कोटंबी (बाऱ्हे), जांभुळपाडा (बाऱ्हे), गहाले, खडकमाळ, देवळा, मेरदांड, पळसेत, कोटंबी (महाले), मनखेड, भाटविहिर, हेबांडपाडा, नडगदरी, सादुडणे, मुरुमदरी, वडपाडा (मनखेड), शेंगाणे, मोधळपाडा, विजुरपाडा, सांबरखल, ओरंभे, मास्तेमाणी, मांगदे, आंबेपाडा (हस्ते), हस्ते, हापूपाडा, सुफतळे, जाहुले, सायळपाडा, जांभुळपाडा (दा.), कळमणे, खिरमानी, आंबोडे, सरमाळ, आंबुपाडा (बे.), झगडपाडा, केळावण, खोकरविहिर, खडकी (दिगर), खिर्डी, खोबळा (दि), कहांडोळपाडा, भेनशेत, उंडसोहळ भाटी, पिंपळचोंड, करंजुल (पे), राक्षसभुवन, आमदा (बाऱ्हे), मांडवा हि गावे असुन चिंचदा, बोरपाडा, सर्कलपाडा, बांजूळपाडा, जायविहिर, रानपाडा, आंब्याचा पाडा, कवेली, बर्डा, कचूरपाडा, सागपाडा, डंबुरणे, कोडीपाडा या १३ पाड्यांचा समावेश आहे.(वार्ताहर)
बाऱ्हे पोलीस ठाण्याअंतर्गत ६१ गावे, १३ पाड्यांचा समावेश
By admin | Updated: November 19, 2015 23:25 IST