नाशिक : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी जलयुक्त शिवार अभियान संकल्प गावपातळीवर जास्तीत जास्त राबविण्याची घोषणा केल्यानंतर त्याला नाशिक जिल्हा ग्रामसेवक संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक तालुक्यातून एक गाव याप्रमाणे जिल्'ात १५ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांनी दिली. या पंधरा गावांची निवड अंतिम टप्प्यात असून, येत्या एक-दोन दिवसांत या अभियानाचा शुभारंभ सर्वत्र १५ तालुक्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळी गावांची निवड प्राधान्यक्रमाने करण्यात आली असून, या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवून गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यावर या अभियानांतर्गत भर देण्यात येणार आहे. दत्तक घेतलेल्या १५ गावांमध्ये स्थानिक ग्रामसेवक तसेच ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जलसंधारणाची आवश्यक ती कामे राबविण्यावर भर देण्यात येईल. तसेच शासनाच्या जलसंधारणाच्या योजनांबाबत जनजागृती बरोबरच लोेकसहभाग वाढविण्याबाबतही आवश्यक ते उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कैलास वाकचौरे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ग्रामसेवक संघटनेने सुरुवातीला १५ गावांमध्येच हे अभियान राबविण्याबाबत तसेच गावे दत्तक घेण्याबाबत निर्णय घेतला असला तरी पुढे जलयुक्त अभियानाची उपयुक्तता व महत्त्व वाढल्यावर दत्तक घेणाऱ्या गावांची संख्या वाढविण्यात येईल, असा विश्वासही कैलास वाकचौरे व संघटनेचे सचिव रवींद्र शेलार, संजय गिरी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ग्रामसेवक घेणार १५ गावे दत्तक प्रत्येक तालुक्यातील एक गाव होणार जलयुक्त शिवार :
By admin | Updated: January 3, 2015 01:44 IST