सिन्नर : कारवाडी (शहा) शिवारात मृत बिबट्या आढळून दोन दिवस उलटल्यानंतरही त्याची विल्हेवाट लावण्यास मोठा विलंब होत आहे. शनिवारी सायंकाळी मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाण्याकडे एक दिवस उशीर केला तर रविवारी दिवसभर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने दोन दिवसांपासून मृत बिबट्याची हेळसांड सुरु आहे.कारवाडी (शहा) शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलांना दुर्गंधी येत असल्याने परिसरात एखादा प्राणी मृत झाल्याचा संशय येत होता. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सूमारास बाबासाहेब जाधव यांच्या सोयाबीन पीकाच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या निदर्शनास आला. शेतकऱ्यांनी शनिवारी सायंकाळी वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ दूर असल्याने व अंधाराचे कारण देत घटनेची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच मृत बिबट्यावर रात्रभर लक्ष ठेवून एकप्रकारे राखण करण्याचा अजब सल्ला दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी कारवाडी शिवारातील घटनास्थळावर पोहचले.त्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना रविवारी रात्री बिबट्याच्या मृतदेहावर लक्ष ठेवण्यासाठी वॉचमन ठेवावा लागला. शनिवारी वनखात्याची दिरंगाई तर रविवारी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांची अडचण यामुळे दोन दिवसांपासून मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. मृत बिबट्या आढळल्याची माहिती मिळूनही एक रात्रभर रामभरोसे बिबट्याचा मृतदेह ठेवणारे बेजबाबदार वनखाते व शवविच्छेदनास पहावी लागणारी वाट यामुळे पशूप्रेमींकडून संताप व्यक्त झाला आहे. (वार्ताहर)
बेपर्वाई: वनविभागानंतर पशुवैद्यकीय खात्याचा संवेदनहीन कारभार
By admin | Updated: September 28, 2014 23:23 IST