इंडिया सिक्युरिटी प्रेस केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्या अखत्यारित असल्याने प्रेसने त्र्यंबकेश्वर येथील प्लांट उभारण्यास परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताच त्र्यंबकेश्वर येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येईल. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास संपलेली आहे, मात्र तिसऱ्या लाटेचे संकेत मिळाले असल्याने त्र्यंबकेश्वरचा प्लांट लवकरात लवकर उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा लवकर होत नसल्याने डोसअभावी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या फक्त अंजनेरीचे दोन पाॅझिटिव्ह रुग्ण असून त्र्यंबकेश्वर शहराची आकडेवारी शून्यावर आली आहे. यापूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्लांट व हाॅस्पिटल उभारण्याचे मान्य केले होते. तसा विश्वस्त मंडळात प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर निविदा प्रक्रियादेखील झाली होती. परंतु देवस्थानचा ऑक्सिजन प्लांटचा विषय बारगळल्याने इंडिया सिक्युरिटी प्रेस प्लांटसाठी पुढे आली आहे. हरसूलचा प्लांट जुलैअखेर पूर्ण होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी सांगितले. मात्र त्र्यंबकेश्वरच्या ऑक्सिजन प्लांटविषयी अद्यापही अनिश्चितता आहे.
त्र्यंबकेश्वरच्या ऑक्सिजन प्लांटबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST