नाशिक : महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांनी केलेल्या खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी २५ मार्च २०१७ ही अंतिम तारीख देण्यात आली असून, त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा अल्टिमेटम निवडणूक आयोगाने दिला आहे.महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत केलेल्या सर्व खर्चाचा तपशील त्या-त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेळेत सादर करणे बंधनकारक असते. निवडणूक निकालानंतरही त्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाते. परंतु, अद्याप बव्हंशी उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही. उमेदवारांना विविध दस्तावेजासह बॅँक खात्याचे अद्ययावत विवरणपत्र सादर करायचे असून, यापूर्वी दैनंदिन खर्च सादर करताना निदर्शनास आणलेल्या उणिवांबाबतही अनुपालन सादर करावयाचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने २५ मार्च ही अंतिम मुदत दिली आहे. याशिवाय, राजकीय पक्षांनीही उमेदवारांसाठी केलेल्या खर्चाची माहिती निकाल लागल्यापासून २० दिवसांच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याबाबतची कार्यवाही राजकीय पक्षांकडून १५ मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अल्टिमेटम
By admin | Updated: March 7, 2017 02:13 IST