नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले पालघर जिल्ह्णाच्या जव्हार तालुक्यातील कुपोषित बालक राहुल काशिराम वाडकर (२, रा़ रुईघर, बोपदरी) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज बुधवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास संपली़ रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाही़ जव्हार तालुक्यातील रुईघर, बोपदरी येथील दोन वर्षांचा राहुल या कुपोषित बालकास सोमवारी (दि़१९) पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ गत महिनाभरापासून गंभीर अवस्थेत असलेल्या राहुलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ. रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते़ राहुलचे वय दोन वर्षे असूनही त्याचे वजन अवघे पाच किलो होते़ कुपोषित व अत्यवस्थ असलेल्या राहुलला उपचारांची नितांत आवश्यकता असल्याने आशा कार्यकर्त्या संगीता किरकिरे यांनी त्याच्या पालकांना दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले़ मात्र जव्हार येथे रुग्णालयात रहावे लागेल यामुळे त्याची आई जंगलात जाऊन लपली होती़ यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची आजी व किरकिरे यांनी मंगळवारी (दि़२०) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉ़ कोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते़ रात्रीच्या सुमारास त्यास रक्तही देण्यात आले, मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता़ अखेर पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास राहुलचा मृत्यू झाला़ बुधवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईक रुईघर येथे घेऊन गेले़ (प्रतिनिधी)
अखेर कुपोषित राहुलची मृत्यूशी झुंज अयशस्वी
By admin | Updated: September 22, 2016 01:18 IST