इंदिरानगर : येथील राजे छत्रपती चौकासमोरील शंभर फुटी रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या पाच ते सात फुटी वृक्षाच्या बुंध्याभोवती कचरा जाळण्यात येत असल्याने येथील चार वृक्ष नष्ट झाले आहेत. वृक्षाभोवतालच्या खड्यात कचरा टाकून तो पेटवून देण्याच्या या प्रकारामुळे येथील एका व्यावसायिकाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अमानुषपणे वृक्ष जाळण्याच्या या प्रकारामुळे वृक्षप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राजे छत्रपती चौकासमोरील शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या सोसायटीतील एका व्यावसायिकाने वृक्ष नष्ट केले असल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी राजे छत्रपती चौक ते राजीवनगर झोपडपट्टी या दरम्यान रस्त्याच्या कडेला पाच ते सात फुटी उंचीचे वृक्ष लावले आहेत. या झाडांना पाणी टाकण्यासाठी त्यांच्याभोवती आळे करण्यात आले आहे. या वृक्षांच्या देखभालीची काळजीदेखील घेतली जात आहे; मात्र असे असतानाही येथील वृक्ष जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास संबंधित व्यावसायिकानी आपले दुकान वृक्षामुळे झाकले जात असल्याचे सांगत वृक्षाच्या आळ्यामध्ये केरकचरा, पालापाचोळा टाकून वृक्ष मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वर्तणुकीमुळे चार वृक्ष जळून मृत झाल्याने संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.