नाशिकरोड : क्राइम ब्रॅँच युनिट ३ च्या पथकाने शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा युवकांना ताब्यात घेतले असून त्यांनी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग व एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.क्राइम ब्रॅँच युनिट ३ चे पोलीस हवालदार रवी बागुल यांना नाशिकरोड भागातील दोघा युवकांनी परिसरामध्ये चेन स्नॅचिंग व घरफोडी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस निरीक्षक जी.डी. देव्हडे, बाळासाहेब दोंदे, सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे, संजय मुळक, संतोष कोरडे, शांताराम महाले, गंगाधर केदार, जाकीर शेख, परमेश्वर दराडे आदिंच्या पथकाने जुना ओढारोड नेहे मळा येथे राहणारा आशुतोष अनिल शेलार (वय २३) यास सापळा रचून पकडले. त्यांची कसून चौकशी करून खाक्या दाखविताच त्यांचा दुसरा सहकारी सागर संतोष सूर्यवंशी (वय २४) रा. स्नेहवर्षा अपार्टमेंट, सप्तशृंगीनगर जेलरोड यालादेखील ताब्यात घेण्यात आले. दोघा संशयितांनी नाशिकरोड भागामध्ये दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. तर संशयित सागर सूर्यवंशी यांने त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये एक बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून २७ हजारांची रोकड चोरली होती. त्यापैकी १७ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. दोघा संशयितांना शनिवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. अजून चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
सोनसाखळी चोरणाऱ्या दोन युवकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2015 23:44 IST