नाशिक : कलेक्टर्स सोसायटी ‘रेअर फेअर’ प्रदर्शनात आयोजित ओसवाल आॅक्शनमध्ये गुलशनाबाग म्हणजेच नाशिक मेन्टच्या नाण्याला तब्बल अडीच लाख रुपयांची बोली लागली. या नाण्याची नाशिकच्या संग्राहकांनी खरेदी केली. या आॅक्शनमध्ये देशभरातून आलेल्या संग्राहकांनी सहभाग घेतला होता. इंद्रप्रस्थ सभागृहात कलेक्टर्स सोसायटी आॅफ नुमिसमॅटिक रेअर आयटम्स आयोजित राष्ट्रस्तरीय दुर्मीळ नोटा, नाणी व पुरातन वस्तूंच्या ‘रेअर फेअर २०१६’ प्रदर्शनात शनिवारी ओसवाल आॅक्शन पार पडले. या आॅक्शनमध्ये गुलशनाबाद अर्थात नाशिक मेन्टच्या शाह आलम कालीन नाण्याला संग्राहकांनी सर्वाधिक अडीच लाख रुपयांची बोली लावून खरेदी केली. गुलशनाबाद येथे मुगलकालीन टाकसाळीत शाह आलमच्या काळात नाणे तयार केले होते. त्यावेळी नाण्याची किंमत अर्धा रुपया होती. चांदी धातूपासून तयार करण्यात आलेल्या या नाण्याचे वजन ५.६५ ग्रॅम आहे. लिलावात स्वतंत्र भारतातील चलणी नाणे व नोटांसोबतच अनेक पुरातन नाण्यांचाही समावेश होता. पाचशे वर्षांपूर्वीचे गुलशनाबाद अर्थात नाशिकच्या नाण्यांना संग्राहकांनी अधिक पसंती दिली. या प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावरील दुर्मीळ, मौल्यवान, नाणे व नोटांच्या संग्राहकांनी सहभाग घेतला. प्रदर्शनात या पुरातन वस्तूंच्या संग्राहकांसाठी स्पर्धाही आयोजित केली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, तोडीवाला आॅक्सन्सचे संचालक फोरूख तोडीवाला, रिझर्व्ह बँकेचे माजी प्रिन्सिपल जनरल मॅनेजर बाजील शेख यांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रदर्शनात १००० वर्षांपूर्वीची पंचमार्क नाणे, सातवाहन राजांची नाणी, मुघलकालीन नाणी तसेच ब्रिटिशकालीन व स्वतंत्र भारतातील नाणे व नोटांसह परदेशातील नोटा व नाण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सुवर्ण होन खास आकर्षण ठरत आहे. तसेच मुघलकालीन सोन्याची व चांदीची नाणीही इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. येथील सुमारे ५०० वर्षांपूर्वीची नाणी तसेच भारतातील विविध संस्थानिकांची नाण्यांसोबतच शस्त्रास्त्रेही प्रदर्शनात बघायला मिळत असून प्रदर्शनात विविध ऐतिहासिक वृत्तपत्रांचाही समावेश आहे. तसेच १९३८ सालची विंटेज बाईकही या प्रदर्शनाचे आक र्षण ठरत असून अनेकजण तिच्याक डे कुतुहलाने पाहत आहेत. दरम्यान, प्रदर्शनात लंडन येथील ओरिएंटल न्यूमिसमॅटिक सोसायटीच्या दक्षिण आशिया विभागातर्फे नाण्यावर चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
दुर्मीळ नाण्याला अडीच लाखांची बोली
By admin | Updated: January 9, 2016 23:09 IST