नाशिक : भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या पंचवटीतील दोघा सराईत मोबाइल चोर गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ अजित शशिकांत खिच्ची (२७ रा. भराडवाडी, फुलेनगर) व गणेश गौतम गायकवाड (१९ रा. अवधूतवाडी, दिंडोरीरोड) अशी या सराईत चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचे चोरलेले २९ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख हे शहरातील चेनस्नॅचिंग, घरफोड्या, दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करीत होते़ उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना पंचवटीतील खिच्ची व गायकवाड हे महागडे मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्याची पोलिसी स्टाईलने चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाइल चोरीची कबुली दिली़ पेठ फाट्यावरील भाजीबाजारात खरेदीसाठी आलेल्या एका डॉक्टरच्या खिशातील मोबाइल चोरल्याची कबुलीही संशयितांनी दिली आहे़ दरम्यान, हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत़ या दोघांच्या अटकेमुळे मोबाइल चोरट्यांचे मोठे रॅकेट समोर येणार आहे़ शहर गुन्हे शाखेतील पोलीस नाईक शरद सोनवणे,आतिश पवार, विशाल काठे, विशाल देवरे, संदीप भुरे, स्वप्नील जुंद्रे, नीलेश काटकर, विजय टेमगर, शांताराम महाले, नीलेश भोईर, निर्मला हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)
चोरट्यांकडून दोन लाखांचे मोबाइल जप्त
By admin | Updated: April 12, 2017 01:24 IST