नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवनच्या तीनही प्रवेशद्वारांवर गेटबंद आंदोलन करून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडीच तास डांबणाऱ्या सुमारे दोनशे घंटागाडी कर्मचाऱ्यांवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ महापालिका श्रमिक संघ संघटनेच्या नेतृत्वाखाली घंटागाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि़३०) महापालिकेवर मोर्चा काढला़ यावेळी आयुक्तांनी चर्चेसाठी यावे, या मागणीसाठी आंदोलक अडून बसले़ मात्र, आयुक्तांनी नकार दिल्याने संतप्त आंदोलकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करून महापालिकेच्या तिन्ही गेटवर ठिय्या आंदोलन केले़ महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुटीनंतर डांबून ठेवून बाहेर पडण्यास आंदोलकांनी मज्जाव केला होता़ सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनातील महादेव खुडे, शांतीलाल अहेर, सुभाष गवारे, कमलाकर दिवे यांच्यासह सुमारे दोनशे घंटागाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले़ महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरक्षा अधिकारी मधुकर लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
दोनशे घंटागाडी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 1, 2015 01:18 IST