नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून आढावा घेऊन खर्च न झालेल्या विकासकामांबाबत व योजनांबाबतचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रत्येक विभागनिहाय दोन तास आढावा घेण्याचे नियोजन आखले असून, नेमक्या ‘फाईली’ कोठे अडकल्या आहेत, याचा ते या आढाव्यातून शोध घेणार असल्याचे समजते.नुकत्याच झालेल्या खर्चाच्या आढाव्यात जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी अवघा ४५ टक्के निधीच खर्च झाल्याचे आढळून आले होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोेनकांबळे यांनीही त्यांच्या आढाव्यात सर्वच विभागांचा त्यातही समाज कल्याण, कृषी, आरोग्य पशुसंवर्धन या विभागांचा खर्च कमी झाल्याचे त्यांना आढळून आले होते. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर असलेल्या काही नस्ती तसेच लघुपाटबंधारेच्या २७०२ लेखाशीर्षांतर्गतच्या काही नस्ती ठरावीक पदाधिकाऱ्यांकडे गेल्या काही दिवसांपासून अडकून पडल्याचा आरोप करण्यात येत असून, भाजपाचे एक शिष्टमंडळ यासंदर्भात लवकरच पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.या पार्श्वभूमीवर नुकतेच बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नेमका खर्च का होत नाही? योजना मार्गी का लागत नाही? नस्ती कोठे अडकल्या आहेत काय? यासाठी सर्वच खातेप्रमुखांकडून विभागनिहाय आढावा घेण्याचे निश्चित केले असून, त्यानुसार विभागनिहाय दोन दोन तासांचा आढावा ते आता घेणार आहेत. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांची अडचणखर्च कमी झालेला असल्याने तो वेळेत व्हावा, विकासकामे मार्गी लागावीत, तसेच वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात, हाच या आढाव्यांमागील उद्देश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. त्यामुळे नस्ती अडवून ठेवलेल्या पदाधिकाऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
अडकलेल्या नस्ती काढण्यासाठी शंभरकर देणार दोन तास
By admin | Updated: December 7, 2015 22:55 IST