नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अंडासेलमधील कैद्याकडे आढळलेल्या मोबाइलमुळे कारागृहातील कर्मचारी बबन राठोड व रवींद्र मोरे या दोघांना कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी निलंबित केल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली आहे़ नाशिकरोड कारागृहात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर मोबाइल सापडले होते. राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणानंतर तत्कालीन कारागृह अधीक्षकांना बदलीला सामोरे जावे लागले होते. तसेच काही अधिकाºयांनाही कारवाईचा फटका बसला होता. त्यामुळे काही कैद्यांना तळोजा आणि पुणे कारागृहात हलविण्यात आले होते. कारागृह महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी नाशिकरोड कारागृहास जुलैमध्ये भेट दिली होती. त्यापूर्वी २० जुलैला रात्री अंडासेलमधील गुंड उमेश नागरे याच्याकडे मोबाइल सापडला. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने नागरेकडील मोबाइल जप्तीची कारवाई केली.उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांना अहवाल पाठवून चौकशीचे आदेश दिले होते. या अहवालात मोरे आणि राठोड हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर धामणे यांच्या आदेशान्वये निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ आधीही नाशिकरोड कारागृहात कैद्यांकडे मोबाईल तसेच अंमली पदार्थ सापडले होते.
नाशिकरोड कारागृहातील दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:18 IST