इंदिरानगर : राजीवनगर येथील भगवती चौकात शनिवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन टोळक्यांनी अक्षरश: धुडगूस घातला़ या टोळक्यांमधील शिवीगाळ व तिचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते़ विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, या टोळक्यांमध्ये दोन पोलीसपुत्रांच्या दुचाकी असून, त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राजीवनगर येथील भगवती चौकात १५ ते २० युवक धूमस्टाईल करीत दुचाकीवर टोळक्याने आले़ दुचाकीवर विविध कसरती करीत असलेल्या या टोळक्यांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांना शिवीगाळ दगडफेक करण्यास सुरुवात केली़ अचानक सुरू झालेला दुचाकींचा थरार आणि दगडफेकीमुळे परिसरात घबराट पसरून तणाव निर्माण झाला होता़ यावेळी इंदिरानगर परिसरात गस्त घालत असलेले पोलीस निरीक्षक सरदार पाटील घटनास्थळी पोहोचल्याने या टोळक्याने पळ काढला; परंतु या पळापळीत टोळक्यातील चौघांना आपली वाहने सोडून पळ काढावा लागला़ तसेच घटनास्थळी सुमारे शंभर नागरिक जमा झाले होते़ त्यांनी या ठिकाणी नेहमीच टवाळखोर आणि गुन्हेगारांपासून त्रास होत असल्याची तक्रार केली, तर नगरसेवक सतीश सोनवणे यांनी येथील चहाची टपरी व खाद्यपदार्थांच्या गाड्या हलविण्याची मागणी केली़ जानेवारीमध्ये संक्रांतीच्या दिवशी टवाळखोरांनी धुडगूस घातला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती़ या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून, टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़ दरम्यान, या टोळक्यातील युवकांचा इंदिरानगर पोलीस शोध घेत आहेत़ (वार्ताहर)
दुचाकीवरून आलेल्या दोन टोळक्यांनी धुडगूस घातला़
By admin | Updated: November 17, 2014 01:24 IST