नाशिक : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकरोड येथून सुटणाऱ्या रेल्वेचे दोन डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे ही गाडी आता सोळाऐवजी अठरा डब्यांची राहणार आहे. निमंत्रित मान्यवर व खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र डब्यात व्यवस्था करण्यात आली आहे. घुमान येथे येत्या ३, ४ व ५ एप्रिल रोजी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी १ एप्रिल रोजी नाशिकरोड येथून पहाटे ४ वाजता खास रेल्वे सोडली जाणार आहे. शहर परिसरातून सुमारे एक हजार नाशिककर या रेल्वेने घुमानकडे रवाना होणार आहेत. या सर्वांना रात्री ९ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाचारण करण्यात आले असून, तेथे त्यांच्यासाठी स्वागतकक्ष उभारण्यात येणार आहे. तेथे त्यांना चहा व संमेलनाचे किट दिले जाणार आहे. त्यात ओळखपत्र, शबनम बॅग, टुथपेस्ट, ब्रश, टोपी, खास पोशाख या बाबींचा समावेश राहणार आहे. याशिवाय प्रत्येकाची बोगी व सीट क्रमांकही सांगितला जाणार आहे. येथे रसिकांच्या विश्रांतीची सोय करण्यात येणार आहे. पहाटे चार वाजता गाडीत बसल्यानंतर प्रत्येकी दहा प्रवाशांमागे एक स्वयंसेवक उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी पुण्याच्या एका महाविद्यालयाचे साठ विद्यार्थी दाखल होणार आहेत. प्रवासादरम्यान रेल्वेत साहित्यरसिकांसाठी निरनिराळ्या स्पर्धा, प्रश्नमंजूषा घेतल्या जाणार असून, त्यांचे निकाल रेल्वेतच घोषित होणार आहेत. एवढेच नव्हे, तर विजेत्यांना बक्षिसेही रेल्वेतच दिली जाणार आहेत.
‘घुमान’साठी वाढवले रेल्वेचे दोन डबे
By admin | Updated: March 26, 2015 23:52 IST