सिडको : विल्होळी येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राहुल चव्हाण (१६) व अक्षय पवार (२०) अशी या दोघांची नावे असून, ते सिडकोतील पंडितनगरमधील रहिवासी आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि़१) दुपारी राहुल चव्हाण, अक्षय पवार व अंकुश नन्नावरे हे तिघे मित्र कामाच्या शोधात विल्होळी परिसरातून जात होते़ रस्त्यात लागलेल्या विल्होळी तलावात पोहण्याचा त्या तिघांनाही मोह झाला़ मात्र, तिघांनाही पोहता येत नसल्याने यातील राहुल चव्हाण व अक्षय पवार हे थर्माकॉलच्या साहाय्याने तलावात उतरले़ काही अंतरावरील खोल पाण्यात गेल्यानंतर दोघेही पाण्यात बुडू लागले़ तलावाच्या काठावर असलेल्या अंकुश नन्नावरे याने या दोघांना पाण्यात बुडताना पाहून परिसरातील युवकांना मदतीची हाक दिली़ परंतु मदतीसाठी कोणीही न आल्याने या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला़ अंकुशने सदर घटनेची माहिती दोघांच्याही घरच्यांना कळविली़ मयत राहुल चव्हाणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, तर मयत अक्षय पवारच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे़ या दोघांवरही मोरवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़(वार्ताहर)
विल्होळी तलावात सिडकोतील दोघांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: May 3, 2015 01:32 IST