न्यायडोंगरी : मूळडोंगरी गावातील इयत्ता चौथीत शिकणारे दोन मुले पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. गावातील तोडा वस्तीवर धार्मिक सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने लहान मुले शाळेत न जाता कुटुंबीयांसह कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान कृष्णा गोकुळ चव्हाण (१०) व गोलू भाईदास चव्हाण (१०) हे दोघे मित्र सर्वांच्या नजरा चुकवून जवळच असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुले घरी न आल्याने शोधाशोध केली असता तलावाच्या कडेस मुलांचे कपडे पडलेले असल्याची माहिती मिळाली. लगेच सर्वांनी तलावाकडे धाव घेत पाण्यात उड्या घेऊन तळाशी शोध घेतला असता या दोन्ही मुलांचे मृतदेह गाळात रुतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी.बी. ढोंबे यांनी घटनास्थळी भेट देऊन करून आकस्मित मृत्यूची नोंद केली.दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. याबाबत अधिक तपास पो. हवालदार कडभाने, पोलीस शिपाई कोळी हे करीत आहे.
मूळडोंगरी येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: August 27, 2015 23:57 IST