नाशिक : मागील वर्षभरात सौर ऊर्जा विभागामार्फत तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीचा ठेका अद्यापही चर्चेत असतानाच शुक्रवारी (दि. ८) पुन्हा याच विभागामार्फत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या सौर पथदीपांच्या पुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला सौर पथदीप खरेदीसाठी पहिल्यांदा तीन कोटी व दुसऱ्या वर्षी अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. पहिल्या तीन कोटींच्या निधीतून सौर पथदीपांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सौर ऊर्जा विभागाने जयपूर स्थित कंपनीला दर कराराप्रमाणे सौर पथदीपांचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात या कंपनीने दिलेल्या वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्यानेच कृषी विभागाला दुसऱ्यांदा या सौर पथदीपांचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा काढण्याची नामुष्की ओढवली. या ई-निविदा पद्धतीत गुजरातस्थित कंपनीने अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा चक्क २८ टक्के कमी दराने निविदा भरल्या. त्यामुळे ही निविदा रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीत करण्यात आला. प्रत्यक्षात असा ठराव करण्याचा अधिकार स्थायी समितीला नसल्याने (त्या रक्कमेच्या मर्यादेची खरेदी रद्द करण्याचा अधिकार नसल्याने) हा ठराव रद्द करण्यात आला. आता १ जानेवारी २०१६ मध्ये या तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीला मुहूर्त सापडून हा ठेका सर्वांत न्यूनतम दर असलेल्या गुजरातच्या कंपनीला देण्याऐवजी विभागून दोघांना ठेक्याचा ‘अहेर’ देण्याचा अजब निर्णय कृषी विभागाने घेतला. आता हे सर्व प्रकरण ताजे असतानाच कृषी विभागाच्या सांैर ऊर्जा विभागाने अडीच कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी पुन्हा ई-निविदा काढल्या असून, ९ ते २३ जानेवारीपर्यंत त्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधीचीच खरेदी रखडली असताना आणि पुरवठा बाकी असताना पुन्हा नव्याने दुसरी खरेदी करण्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांत अडीच कोटी खर्चाचे आव्हान
By admin | Updated: January 9, 2016 00:35 IST