नाशिक : जिल्ह्यातील विविध बँकांच्या ३५० शाखांमधील ३ हजार ५०० कर्मचारी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने पुकारलेल्या संपात सहभागी झाल्याने जिल्हाभरातील सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या धनादेशांचे क्लिअरिंग रखडले. संपात सहभागी झालेल्या शहरातील कर्मचाऱ्यांनी टिळकपथ येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर एकत्रित येऊन द्वारसभा घेतली. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांशी कारकुनी कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने शहरातील बहुतेक बँका मंगळवारी बंद राहिल्या. राष्ट्रियीकृत बँकांतील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने संबंधित बँकांमधील रोखीच्या व्यवहारांसह हजारो कोटींचे धनादेश क्लिअरिंग एक दिवस रखडले आहे. बँक कर्मचारी संघटनांची कृती समिती असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने याबाबतची माहिती दिली. नोटाबंदीच्या काळात केलेल्या अतिरिक्त कामांचाही मोबदला बँकिंग कर्मचाऱ्यांना मिळावा, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या असून, नोटबंदीनंतर बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे पंतप्रधान कौतुक करीत आहेत. मात्र दोन महिने होऊन त्याचा मोबदला मिळालेला नाही. याउलट बाजारात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशीन अद्याप एकाही बँक शाखेत पुरवलेल्या नसल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हे थांबवून तत्काळ कायमस्वरूपी तत्त्वावर भरती करण्याची संघटनेतर्फे मागणी करण्यात आली. आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएसनचे माजी उपाध्यक्ष गिरीश जहागिरदार, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव शिरीष धनक, आॅल इंडिया बँक एम्पलॉइज युनियनचे गिरीश कुलकर्णी, नाशिक बँक आॅफ इंडिया एम्पलॉइज युनियनचे के. एस. देशमुख, राजीवकुमार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साडेतीनशे कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Updated: March 1, 2017 00:55 IST