लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : म्हसरूळ शिवारातील बोरगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार परिसरातील रहिवासीयांनी केली आहे. टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपासून रात्रीच्या सुमाराला काही मद्यपी टोळके तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या गावगुंडांचे टोळके परिसरातील मोकळ्या पटांगणात रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून आरडाओरड करतात. तसेच दिवसाच्या सुमाराला रस्त्याने ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढतात. यापूर्वी परिसरात खुलेआम संचार असणाऱ्या टोळक्याने परिसरात दहशत माजविण्याचाही प्रकार केला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. परिसरातील टवाळखोरांमुळे परिसरातील महिला तसेच नागरिक त्रस्त झाले असले तरी याकडे म्हसरूळ पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. म्हसरूळ पोलिसांनी रात्रीच्या सुमाराला बोरगड परिसरात गस्त वाढवून टवाळखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बोरगड परिसरात टवाळखोरांचा उपद्रव
By admin | Updated: June 19, 2017 19:02 IST