नाशिक : शहरातील सराईत गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या व निखिल प्रकाश गवळे या दुहेरी हत्त्याकांडातील प्रमुख संशयित व फरार नगरसेवकपुत्र भूषण प्रकाश लोंढे व त्याचे साथीदार संदीप गांगुर्डे व आकाश मोहिते या तिघांनाही पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न कॉलनीतून सोमवारी (दि़८) रात्री अटक केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ सुमारे सात महिन्यांपासून लोंढे हा आपल्या साथीदारांसह फरार होता़रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अे)चे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या पीएल ग्रुपचा सदस्य प्रिन्स सिंगच्या वाढदिवसानिमित्त ३१ डिसेंबर २०१५ रोजी वैतरणा धरणावर हॉटेल पिकनिक पॉर्इंटवर पार्टी ठेवण्यात आली होती़ या पार्टीत झालेल्या वादातून तडीपार सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखिल गवळे या दोघांची सातपूरच्या स्वारबाबानगरमधील पीएल ग्रुपच्या कार्यालयात गोळ्या झाडून खून करण्यात आला़ ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच आव्हाड व गवळे या दोघांचेही मृतदेह फोर्ड एन्डिव्हर कारमध्ये (एमएच १४, बीएफ १२१२) टाकून ते जव्हार रोडलगत तोरंगण घाटातील दरीत फेकून देण्यात आले होते़ ८ जानेवारीला या दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर किरण आव्हाड यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्र्यंबक दुहेरी हत्त्याकांड : अन्य दोघे संशयितही ताब्यात
By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST