नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वरी होणारी भाविकांची गर्दी पाहता, चार दिवस खासगी वाहनांना त्र्यंबक शहरात प्रवेशबंदी करण्याचा अधिसूचना काढण्यात आली आहे. याकाळात भाविकांनी वाहनतळावरून एस. टी. बसनेच प्रवास करावा लागणार आहे. येत्या २२ आॅगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांकडून ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी होत असते. भाविक थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत वाहने आणत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन लांबच लांब रांगा लागत असतात, ते टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या श्रावण सोमवार पूर्वीच दोन दिवस आधी सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना बंदी घातली आहे. शुक्रवार, दि. १९ आॅगस्टच्या सकाळी आठ ते मंगळवार दि. २३ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत ही बंदी असेल. भाविकांचे वाहने खंबाळा, पेहेनेबारी, अंबोली टी पॉइंट येथेच अडविली जातील. तेथून ते एस. टी. बसने त्र्यंबकेश्वरपर्यंत जाऊ शकतील. अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी वाहन बंदीची अधिसूचना जारी केली आहे. (प्रतिनिधी)
तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकला वाहनबंदी
By admin | Updated: August 14, 2016 02:45 IST