नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरतीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांच्या तडकाफडकी बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. जगदाळे यांची बदली झाली आहे. सोमवारी (दि.८) राज्यभरातील ३० अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये डी. के. जगदाळे यांच्या बदलीचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांची तडका फडकी उचलबांगडी करण्यात आली होती. भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आदिवासी विकास विभागाच्या नोकरभरतीत ३०० कोटींचा घोटाळा झाला असून, त्यास बाजीराव जाधव यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दोन उपमहाव्यवस्थापकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. तर व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांची बदली करण्यात आली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डी. के.जगदाळे यांची बदली झाली आहे. (प्रतिनिधी)
आदिवासी विकास महामंडळ व्यवस्थापकपदी डी. के. जगदाळे
By admin | Updated: August 9, 2016 01:28 IST