गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथील नवरचना विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक रजनी राजेंद्र हुदलीकर या त्यांचा मुलगा राजससोबत ॲक्टिव्हा दुचाकीने (एम.१५ ईयू ९७३२) घरी परतत होत्या. भोसलाच्या शिशुविहार शाळेसमोरील वाहतूक बेटाजवळ त्यांची दुचाकी आली असता, त्याचवेळी सिल्व्हरचे झाड अचानकपणे उन्मळून पडले. या दुर्घटनेत झाडांच्या फांद्यांचा मार बसल्याने हे दोघेही मायलेक गाडीवरून खाली पडले. सुदैवाने राजसच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला नाही; मात्र मायलेकांना शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कॉलेज रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील झाडाच्या फांद्या कटरने कापून अडथळा दूर केला. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
दुसरी घटना त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नलजवळील वैभवी अपार्टमेंटजवळ घडली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील एक मोठे झाड शेजारील दुचाकी वाहनविक्रीच्या शोरूमवर कोसळले. या घटनेत शोरूमचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही दुर्घटनांमध्ये जीवितहानी टळली.
--इन्फो--
वाहतूक पोलिसाचे प्रसंगावधान
भोसला शाळेच्या समोरील चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी सारंग मोहिते यांनी धाव घेतली. घटनेचे प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने मायलेकांना उचलले. यावेळी येथून मार्गस्थ होत असलेले कारचालक सुभाष पाटील यांनी त्यांची मोटार त्वरित थांबवली आणि जखमींना मोहिते यांच्या मदतीने मोटारीत बसवून त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. मायलेकांची प्रकृती स्थिर असल्याचे राजेंद्र हुदलीकर यांनी सांगितले.
--इन्फो--
पांडवनगरीत झाड कोसळले
इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील वल्लभ सोसायटीजवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्पॅतोडिया या विदेशी प्रजातीचे झाड कोसळले. यावेळी पावसाच्या सरींचा वर्षाव सुरू असल्याने रस्त्यावरून कोणी ये-जा करत नसल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे फायरमन प्रमोद लहामगे, श्रीराम देशमुख, नंदकुमार व्यवहारे यांनी तत्काळ झाडाच्या फांद्या इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने कापून अडथळा दूर केला. यावेळी मनपाच्या खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचीदेखील मदत मागितली गेली; मात्र त्यांनी येथेे पोहोचण्यास नकार दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.
--इन्फो--
...अन्यथा अनर्थ झाला असता
डीजीपीनगर-२ येथील वनश्री कॉलनीमधील धोकादायक स्थितीतील कडुलिंबाचे झाड अर्धवट स्थितीत तुटून जमिनीच्या दिशेने लोंबकळलेल्या अवस्थेत होते. याबाबतची माहिती सिडको अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन हे धोकादायक झाड सुरक्षितरीत्या काढून घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
---