नाशिक : खासगी डॉक्टरांकडे डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांनी संबंधित रुग्णाची माहिती महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाला अथवा जवळच्या शहरी आरोग्य केंद्राला तत्काळ कळविणे बंधनकारक असून महापालिकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी खासगी डॉक्टरांच्या बैठकीत बोलताना दिले.शहरात डेंग्यूच्या आजाराचा फैलाव होत असल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा हादरली असून त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत डॉ. विजय डेकाटे यांनी मार्गदर्शन केले. खासगी रुग्णालयात डेंग्यू संशयित रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तनमुना तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय डेंग्यूची लागण झाल्याचे जाहीर करू नये. डॉक्टरांनी रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची माहिती तत्काळ जवळच्या शहरी आरोग्य केंद्राला कळवावी, त्यानंतर मनपाची यंत्रणा प्रत्यक्ष येऊन रक्तनमुने मोफत तपासणी करून देईल. तोपर्यंत मनपाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच रुग्णांवर उपचार करावेत, असेही डेकाटे यांनी सांगितले. याशिवाय, खासगी डॉक्टरांनी डेंग्यू संशयित रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णांबरोबरच त्याच्या नातेवाइकांचेही डेंग्यूपासून प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रबोधन करावे. मलेरियाबाबतही उपचार मनपाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच व्हावेत. याशिवाय खासगी डॉक्टर आणि महापालिका यांच्यात समन्वय असणेही गरजेचे असल्याचे डेकाटे यांनी सांगितले. यावेळी आयएमएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भंडारकर, निमाचे डॉ. अभिनंदन कोठारी, डॉ. किर्लोस्कर, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. समीर लासुरे, पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनचे डॉ. सुशील अहिरे यांच्यासह डीएमएलटी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मनपाच्या सल्ल्यानेच डेंग्यू रुग्णावर उपचार
By admin | Updated: July 23, 2016 01:07 IST