नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळे शहरातून राज्यातील पुणे, मुंबईसह, नागपूर अमरावती, धुळे जळगाव, औरंगाबाद कोल्हापूर सारख्या विविध जिल्ह्यांमध्ये ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हळुहळू वाढू लागली आहे. त्यातच आता नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा सण जवळ आल्याने यानिमित्ताने माहेरवाशीणींचीही ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांमध्ये भर पडली आहे. प्रवासी वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी ट्रॅव्हल्स बसेसची भाडेवाढ केल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. मात्र अनलॉक आणि राखी पौर्णिमेमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने ट्रॅव्हल्सचे दर वाढविण्यात आल्याचा समज प्रवाशांमध्ये निर्माण होत असला तरी डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगतात. डिझेल दरवाढीमुळे भाडवाढ करण्याशिलाय कोणताही पर्याय नसल्याचेही व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ (बॉक्स)
मार्ग - आधीचे भाडे - आता
नाशिक-मुंबई - ५०० - ६००
नाशिक - पुणे - ४०० -५००
नाशिक -नागपूर - १००० - - १२००
नाशिक - कोल्हापूर - ६०० - ६५०
--
टॅव्हल्सची संख्या दुप्पट
कोरोनाकाळात अनेक शहरांसाठी नाशिकमधून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बस बंद करण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या शहरांसाठी दोन किंवा तीन बस सुरू करण्यात आल्या होत्या. आता हे प्रमाण दुपट झाले असले तरी अजून पाच ते सहा बसपेक्षा अधिक नाही. जवळपास ५० ते ६० टक्के बसेस अजूनही जाग्यावर उभ्या असल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगतात. --
--
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून प्रवासी वाहतूक व्यावसाय मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करीत आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे तसेच राखीमुळे काही प्रमाणात प्रवासी वाढले सले तरी अजूनही ५० टक्क्यांहून अधिक गाड्या जाग्यावरच उभ्या आहे. ज्या बस सुरू आहेत. त्यांचे डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ करण्याशिवाय व्यावसायिकांसमोर कोणताही पर्याय नाही.
- सदाशिव शेट्टी, ट्रॅव्हल व्यावसायिक