नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतुकीचा गोंधळ होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. मुंबई शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या वाहनांसाठी राजूर बहुला आणि विल्होळी येथील जैन मंदिराजवळ ७० एकर जागेत बाह्य वाहनतळ उभारले आहे. या वाहनतळावर सुमारे दहा हजार वाहने उभी करता येणार आहेत. शहरात वाहनांची गर्दी होऊ नये यामुळेच पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तेथून भाविकांची वाहतूक करण्यासाठी पोलीस राष्ट्रीय महामार्ग तीनवरील उड्डाणपुलाचा वापर करणार असून, शटल बससेवेद्वारे महामार्ग बसस्थानकांपर्यंत पोहचविण्यात येईल. मुंबईनाका, वडाळा नाका, द्वारका, टाकळी फाटा, शंकरनगर चौफुली, तिगरानिया चौफुली व तेथून कन्नमवार घाटावर भाविक स्नान करण्यासाठी जाणार आहेत. उड्डाणपुलाखालील मार्गावरून इंदिरानगर आणि राणेनगरकडून येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतुकीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, शहरातून राणेनगर किंवा इंदिरानगरकडे येण्यास बंदी करण्यात आलेली आहे. या मार्गात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भाविकांना पखालरोडच्या दिशेने वर्ग करण्यात येणार आहे, तर मदतकार्य करण्यासाठी पोलिसांनी द्वारका ते बिटको आणि गोल्फ क्लब मैदान ते द्वारका हा प्रशासकीय मार्ग म्हणून तयार केला आहे. या मार्गावरून पर्वणी काळात फक्त प्रशासकीय वाहनांची वाहतूक होणार आहे. विल्होळी येथील ट्रक टर्मिनस आणि विल्होळी येथील सुमारे ३५ हजार भाविकांच्या सोयीसाठी दोन निवारागृहे बांधण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
मुंबई मार्गे येणाऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन
By admin | Updated: May 29, 2015 00:04 IST