नाशिक : व्यापाऱ्यांना त्रासदायक वाटणारा स्थानिक स्वराज्य संस्था कर म्हणजेच एलबीटी हा १ एप्रिलपासून रद्द करण्याच्या घोषणेबाबत युती सरकारने घूमजाव केले असून, व्यापाऱ्यांना चक्क एप्रिल फूल केले आहे. एप्रिल ऐवजी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे सरकारने जाहीर केले असले, तरी त्याविषयी व्यापाऱ्यांबरोबरच उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता जीएसटी लागू करण्याच्या नावाखाली पुन्हा हा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची भीती संबंधितांनी व्यक्त केली आहे.राज्यात भाजपा सेनेचे सरकार येण्यापूर्वीच त्यांनी व्यापाऱ्यांच्या एलबीटी हटाव भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र केंद्र सरकार सर्व कर रद्द करून एकमेव जीएसटी लागू केल्यानंतर एलबीटी लागू करू, असे सांगत सरकारने वेळोवेळी भूमिका बदलली आणि आता १ एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून एलबीटी रद्द करू असे सांगताना बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी खूश होण्याऐवजी नाराजीचा सूर काढला आहे.नाशिकमधील फामचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी राज्य सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. १ एप्रिलपासून एलबीटी रद्द करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच जाहीर केले होते; मात्र आता घूमजाव करीत १ आॅगस्टपासून एलबीटी लागू करणार असल्याचे जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी राज्य सरकारकडून व्यापाऱ्यांची फसगत होत असल्याचा आरोप केला. आता १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले; परंतु पुन्हा पुढील आर्थिक वर्षापासून जीएसटी सुरू होणार असल्याने तोपर्यंत एलबीटीला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे, असे मत व्यक्त केले. निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी कर भरतानाच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करावे, अशी उद्योजकांची इच्छा होती. मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीऐवजी मध्येच एलबीटी रद्द करून गोंधळ निर्माण होईल, असे सांगितले, तर आॅल इंडिया फेडरेशन आॅफ क्लॉथ रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द मात्र व्हॅटमध्ये सरचार्ज वाढणार असल्याने नगरपालिकांमधील व्यापाऱ्यांना त्याचा भुर्दंड बसेल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांना ‘एप्रिल’ फूल
By admin | Updated: March 18, 2015 23:50 IST