सिन्नर : रोटरी क्लब नाशिकरोड व रोटरी क्लब सिन्नर यांच्या पुढाकारातून पांगरी येथील श्री संत हरिबाबा विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी भव्य स्वच्छतागृह उभारण्यात आले. स्वच्छतागृहाचे लोकार्पण डॉ. आनंद झुंझुनवाला (खामगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छतागृह उद्घाटनाच्या छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी १५ स्वच्छतागृहे तसेच विद्यार्थिनींसाठी १० स्वच्छतागृहे, वॉश बेसिन व हात धुण्यासाठी २ हॅण्ड वॉश स्टेशन असे अद्ययावत बांधकाम करून देण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षीसुद्धा विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक डी. बी. गोसावी यांनी केले. सरपंच स्मिता निकम यांनीही रोटरी क्लब व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांनी विद्यालयातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख आणि विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा, कला-क्रीडा व सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. रोटरी क्लब सिन्नरचे अध्यक्ष उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब नाशिकरोडचे अध्यक्ष रोटरीयन डॉ. अमित गांगुर्डे यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
---------------
पांगरी येथे श्री संत हरिबाबा विद्यालयात स्वच्छतागृहाच्या लोकार्पणप्रसंगी डॉ. आनंद झुंझुनवाला, अॅड. विलास पगार, उदय गायकवाड, वैभव मुत्रक, कैलास क्षत्रिय, स्मिता निकम, ज्ञानेश्वर पांगारकर, डी. बी. गोसावी यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व ग्रामस्थ. (०८ पांगरी)