नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची गुरुवारी (दि. २३) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून, उमेदवारांसह सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील ७३ गट आणि १४६ गणांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. दुपारपर्यंत सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे. मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी झालेल्या मतदानानंतर गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी येथील महसूल विभागाने पूर्ण केली आहे. अवघ्या दीड तासात मतमोजणी प्रक्रिया पार पडून निकाली हाती येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ९४ उमेदवारांचे मतदान यंत्रात बंद असलेले भवितव्य गुरुवारी उघडणार आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज जिमखान्यात मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रारंभी टपाली आलेल्या मतदानाची मोजणी होणार आहे. यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन नायब तहसीलदार व दोन अव्वल कारकून असे पाच कर्मचारी टपाली मतदानाची मतमोजणी करणार आहेत. गटासाठी १४ व गणासाठी १४ स्वतंत्र टेबल अशा एकूण २८ टेबल्सवर मतमोजणी केली जाणार आहे. एका टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक, शिपाई अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच वेळी सातही गट व गणांची मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश कोळी, नायब तहसीलदार गिरीश वाखारे यांनी दिली. मालेगाव तालुक्यातील गट व गणांचे निकाल तातडीने घोषित व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. मतमोजणी केंद्रात विद्युत रोषणाई, संगणक मांडणी, केंद्रातील दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या व स्वतंत्र टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
आज फैसला
By admin | Updated: February 22, 2017 23:25 IST