नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाची दसऱ्याने सांगता होणार असून, पूर्वसंध्येला अखेरचा रासदांडिया खेळण्यासाठी ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी लोटली होती.दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन कपड्यांपासून तर स्वप्नातील घरापर्यंत खरेदीला प्राधान्य दिले. बांधकाम व्यावसायिकांबरोबरच दुचाकी-चारचाकी विक्रेत्यांपर्यंत सर्वांनीच विपणन पद्धतीचा अवलंब करत एकापेक्षा एक भन्नाट सवलती व सूट जाहीर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच नागरिकांनीदेखील आपल्या विविध गरजांनुसार आवश्यक ती खरेदी करत सवलतींचा लाभ घेतला. दसऱ्याच्या निमित्ताने पूर्वसंध्येपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत होती.पंचवटी परिसरातील रामकुंड येथे रावणदहन, गांधीनगर रामलीला मैदान, श्रीरंगनगर, गंगापूररोड, तुळजाभवानी मंदिराच्या आवारात रावणाच्या प्रतिकृतींचे दहन करण्यात येणार आहे. रावणवधाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत शहरातील फूलबाजारात नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ दिसून येत होती.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंबरोबरच शहरातील दुचाकी-चारचाकीच्या शोरूममध्येही ग्राहकांची गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)मध्यरात्रीपर्यंत घुमला दांडियाचा आवाजकालिका यात्रोत्सवात उसळली गर्दीकालिका यात्रोत्सवाची आज सांगता होणार असल्याने नवव्या दिवशी संध्याकाळपासून भाविकांची गर्दी लोटली होती. कालिका मातेच्या मंदिरात अबालवृद्धांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रोत्सवात थाटण्यात आलेल्या विविध दुकानांवर वस्तूंची खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रहाटपाळण्यांजवळ तरुणाईच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. यात्रोत्सवात महिलांसह बालगोपाळ व तरुणांची संख्या लक्षणीय होती.शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, पंचवटी, जुने नाशिक, सिडको, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरात मध्यरात्री बारा वाजेपर्यंत विविध मंडळांनी आयोजित केलेल्या रास दांडियाच्या कार्यक्र माची धूम बघावयास मिळाली.
नगाडा संग ढोल बाजे..., शांताबाई शांताबाई.., देवा हो देवा..., पंखिडा-पंखिडा..., म्हारी मां काळीने जाईने किजै गरबा रमै छे..., देवी मां नो गरबो रमतो जाय..., ढोली तारो ढोल बाजे... अशा एकापेक्षा एक गीतांच्या तालावर तरुणाई नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मनमुरादपणे थिरकली.