नाशिक : महापालिका निवडणुकीत ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत संपादन करणाऱ्या भाजपाचा मंगळवारी (दि.१४) सत्ताभिषेक होणार असून, महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी या महापौरपदाची, तर राजकीय पदार्पणातच प्रथमेश गिते उपमहापौरपदाची धुरा सांभाळतील. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत महापालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविण्याचा मान मिळविला. सहाव्या पंचवार्षिक काळात पहिली अडीच वर्षे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे पंचवटीतून सलग पाचव्यांदा महापालिकेत निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांना भाजपाने महापौरपदाची, तर माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांना उपमहापौरपदाची उमेदवारी दिलेली आहे. कॉँग्रेसने महापौरपदासाठी आशा तडवी, तर राष्ट्रवादीने उपमहापौरपदासाठी सुषमा पगारे यांना उमेदवारी दिलेली आहे. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनी यापूर्वीच मतदान झाल्यास तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध कॉँग्रेस आघाडी असाच सामना होणार आहे. महापालिकेत भाजपा-६६, शिवसेना-३५, कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे पक्षीय बलाबल आहे.
आज भाजपाचा सत्ताभिषेक
By admin | Updated: March 14, 2017 00:15 IST