नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इब्राहिम सय्यद ऊर्फ बालम पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रभाग १४ च्या तिकीट वाटपाबाबत नाराजी दर्शविली आहे. सय्यद यांनी १४ ब मधून त्यांच्या सूनबाईसाठी तिकिटाची मागणी केली होती. जुने नाशिकमधील बालम पटेल हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते असून, त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदाची धुरा होती. राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याकडे पदाचा राजीनामा पाठविल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जुने नाशिकमधील प्रभाग १४ अर्थात ‘दुबई वार्ड’मधून त्यांनी त्यांच्या सूनबाई फरीन सय्यद यांच्यासाठी मागासवर्गीय महिला गटातून उमेदवारी मागितली होती. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ही जागा आघाडीने कॉँग्रेससाठी राखीव ठेवली. त्यामुळे कॉँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक व माजी पूर्व प्रभाग सभापती समीना मेमन यांच्या झोळीत उमेदवारी टाकण्यात आली. सय्यद यांच्या सूनबाईचे तिकीट जागा आरक्षणामुळे कापले गेले. राष्ट्रवादीच्या वाट्याला अनुसूचित जाती महिला (प्रभाग अ) ही जागा आल्याने राष्ट्रवादीने विद्यमान अपक्ष नगरसेवक संजय साबळे यांच्या पत्नी शोभा साबळे यांना तिकीट दिले आहे. चुकीचे आरक्षण व सूनबाईचे तिकीट कापले गेल्याने नाराज होऊन पक्षाने सोपविलेल्या पदाचा थेट राजीनामा देत असल्याचे सोमवारी रात्री उशिरा सय्यद यांनी जाहीर केले. निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून डावलले जात असेल तर त्या पक्षामध्ये राहून उपयोग काय? असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केला आहे.समाजवादीकडून निवडणूक रिंगणातबालम पटेल यांनी नाराज होऊन समाजवादी पार्टीचे शहरा ध्यक्ष इम्रान चौधरी यांची भेट घेत दुबई वॉर्डातून सूनबाई फरीन सय्यद यांच्यासाठी तिकीट मिळविले. समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सय्यद यांनी भरला असून, त्या आघाडीच्या महिला उमेदवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. मुस्लीम बहुल परिसर असून, विद्यमान नगरसेविका मेमन यांचे त्यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले आहे.
सूनबाईचे तिकीट हुकले; सासरेबुवांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By admin | Updated: February 7, 2017 23:21 IST